मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची शिफारस करण्यात आली आहे. तसा निर्णयच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलीजिअमने घेतला आहे. या निर्णयावर आज केंद्र विधी आणि न्याय मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले. भूषण धर्माधिकारी यांची २४ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. २४ तासांच्या आतच त्यांना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलीजिअमने ऐतिहासिक निर्णय घेतला असून २८ एप्रिल रोजी न्यायमूर्ती धर्माधिकारी निवृत्त होणार आहेत.
मूळचे नागपूर येथील असलेले न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस.सी. (जीवशास्त्र), अतिरिक्त बीए. इंग्रजी साहित्यात आणि एल.एल.बीबी.एस्सीचे शिक्षण घेतले आहे. १९८० साली विधी शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरात कायद्याचा सराव केला. तसेच जबलपूर (मध्य प्रदेश) येथे अॅड. वाय. एस. धर्माधिकारी यांच्याकडे काम केले. २००४ साली अतिरिक्त न्यायाधीश तर २००६ साली न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सेवाज्येष्ठतेत न्यायमूर्ती धर्माधिकारी हे पहिल्या क्रमांकाचे न्यायमूर्ती असल्याने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.