महापालिकेकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी
शहरात कोरोनाबाधित रुग्ण देशातून पुण्यात आलेल्यांच्या तपासणीसाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयातील यंत्रणेवर ताण येत असून, यासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे आणखी २० डॉक्टर्स आणि ४० नर्सेसची मागणी केली आहे. सध्या कार्यरत असलेले डॉक्टर्स तसेच स्टाफ दररोज १० ते १५ तास काम करत असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे ही मागणी केल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले आहे. सध्या येथील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दररोज परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळ तसेच पालिकेच्या विलगीकरण कक्षात तपासणी करण्यात येत आहे. त्यातील संशयितांना नायडू रुग्णालयात तपासणी तसेच उपचारासाठी दाखल केले जात आहे. या रुग्णालयाचा स्टाफ ४० वरून १४० पर्यंत आहे. मात्र, त्यांच्यावरही ताण येत असून, त्यांनाही आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.